विजयगाथा
विजयगाथा

विजयगाथा

महाराष्ट्राचे शाहीर आम्ही पोवाडे गाणार | दुमदुमणारी शिवगर्जना ललकारीत जाणार ||

हे शाहीरी गाणे लिहून आपल्या शाहीरी शैलीत गाणारे राष्ट्र शिवशाहीर बाबासाहेब देशमुख यांच्या मार्गदर्शनाने शाहीरीमध्ये पाऊंल ठेवलेले राहुरीचे शिवशाहीर विजय तनपुरे हे महाराष्ट्राच्या लोककलेत आगळे वेगळे स्थान असणार्‍या शाहीरांच्या पंक्तीत जाऊन बसले आहेत.
विजय तनपुरे हे बालपणापासून पायाने अपंग असून त्यांनी शाहीरीमध्ये नावलौकीक मिळवत आपल्या अपंगत्वावर स्वकतृत्वाने मात केली आहे, जन्माला येऊन जगावेगळे करण्याचे स्वप्न सर्वच पहातात, परंतु प्रत्येक्षात फारच थोडे जण ती स्वप्ने पूर्ण करतात, ह्या त्यांच्या स्वप्न पुर्तीसाठी वेळ प्रसंगी प्रतिकुल परिस्थितीशी झुंज देण्याचीही तयारी ठेवतात, वयाच्या दुसर्‍या वर्षीच विजय यांना अपंगत्व आले, स्वतः रचना तयार करुन त्या खडया सुरेल आवाजात गाण्याची त्यांची शैली आहे.

नमन करीतो भारत मातेला |
टिळक गोखले आंबेडकराला ||
आठवूनी त्या शुर तान्हाला |
दादोजी बाजीप्रभूला जी जी जी ||

अशा स्वरचित पोवाड्यांनी रसिकावर छाप पाडणारे हे शाहीर वैयक्तीक आयुष्यात दु:खी आहे, कायमचे अपंगत्व घरची शेती त्याच्या व्यंगावर उपचार करण्यासाठे विकावी लागली, घरात गायानाचा वा इतर कलेचा कुठलाही वारसा नसतांना शाहीरी कलेत विजय यांनी चांगलीच झेप घेतली आहे, त्यांच्या या कलाक्षेत्रातील पदार्पणाला शिवशाहीर बाबासाहेब देशमुख, बाबासाहेब पुरंदरे यांच्यापासून  प्रेरणा लाभल्याचे विजय सांगतात, तर राहुरी येथील सर्वश्री रावसाहेब साबळे, खासदार प्रसाद तनपुरे, पत्रकार काळे मामा, सय्यद निस्सार, अरुण धोंडे, ना शाबीरभाई शेख, शिवसेना नेते विलास भानुशाली, शिरीष गुणे यांचे सतत सहकार्य व प्रोत्साहन लाभत असल्याचे विजय मोठ्या अभिमानाने सांगतात.

आज विजय यांच्या ७१ कॅसेट संपूर्ण महाराष्ट्रात उपलब्ध आहेत, एखाद्या विषयावरील कॅसेट तयार करण्यापूर्वी विजय यांना त्या विषयाचा संपूर्ण अभ्यास करावा लागतो, मग ते स्वत: पोवाडा तयार करतात, एका कॅसेटचे रेकॉर्डिंग करायचे म्हणजे सलग दहा तास घसा कोरडा करावा लगतो, आठ आठ दिवस मुंबईला जाण्याची धावपळ, अपंग असूनही विजय कसे करतात हे कोडे उलगडत नाही. त्यांच्या पहाडी आवाजाने त्यांना अनेक चाहते लाभले आहेत. पुणे, नगर, जळगाव, मुंबई आकाशवाणीवर दुरदर्शनवर त्यांचे पोवाड्याचे कार्यक्रम झाले आहेत, याशिवाय बहुचर्चीत अशा झी.टी.व्ही वर, दुरदर्शनच्या
सुरभी या कार्यक्रमात विजय यांचे पोवाडे गाजले आहेत.

शाहीरी कलेच्या जोरावरच विजय यांचा सिनेनट सचिन, महेश कोठारे, अशोक सराफ, संजय दत्त ते थेट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, खा. शरद पवार, रामदास आठवले, नाना पाटेकर, कुलदीप पवार, धर्मेंद्र, आदित्य पांचोली या दिग्गजांशी थेट परिचय आहे. या शाहीर क्षेत्रातील अत्युच्च शिखर गाठण्याचे स्वप्न व ध्येय ठेवणारे शाहिर विजय तनपुरे कष्ट करण्याची जिद्द  ठेवली तर यश निश्चितच मिळते असा मोलाचा सल्लाही नवोदितांना देतो.

पोवाडा म्हटलं म्हणजे आपल्या समोर पहिल नाव उभ रहात ते छत्रपती शिवाजी महाराजंच. शिवरायांच्या महान पराक्रमच गुणगान महाराष्ट्रातल्या अनेक नामवंत शाहीरांनी केलयं. विजय ही आपल्या खास शैलीत महाराजांचा पोवाडा म्हणतात, पोवाड्याचे पारंपारीक विषय सोडून प्रचलीत विषयावरही त्यांनी पोवाडे तयार  केले आहेत, अगदी फुलन देवीवरही पोवाडा आहे, एवढेच नव्हे तर त्या पोवड्याची कॅसेटही टिप्स कंपनीने काढली आहे. त्याची पार्श्वभूमी जरा गमतीची आहे, कॅसेटाच्या रेकॉर्डींगसाठी विजय आपल्या साथीदाराला घेऊन मुंबईत आले होते. सन १९९४ ची घटना आहे, ठरल्या प्रमाणे रेकॉर्डींग झाले, ते पुन्हा गावी निघाले, तेव्हा कॅसेट कंपनीचे अधिकारी म्हणाले थांबा मला तुमच्याकडून फुलन देवीवर पोवाडा हवाय. विजय यांना आश्चर्य वाटले. पण त्यानेही ते आव्हान स्वीकारलं साप्ताहिक लोकप्रभेत फुलनदेवीची मुलाखत प्रसिद्ध झाली होती ती वाचून एका रात्रीत त्यांनी फुलनंदेवीवर पोवाडा लिहीला आणि दुसर्‍या दिवशी लगेच रेकॉर्डींग झालं.

विजयच्या इतक्या कॅसेटस निघाल्या असल्या तरी हिंदू हृदय सम्राट या कॅसेटने त्याला खरखुर समाधान मिळवून दिलं, शिवसेना प्रमुखांचे कौतुकाचे शब्द आशीर्वाद व स्वतःची जिद्द या शिदोरीवरच त्यांनी संगीत क्षेत्रातील वाटचाल करायचं ठरवलं आहे.
पोवाड्याची कॅसेट निघावी यासाठी सोसलेल्या कष्टाची जाणीव विजय अजून विसरलेले नाहीत, ते म्हणतात ”व्हीनस कॅसेट कंपनीकडे मी तब्बल सात वर्षे फेर्‍या मारीत होतो. प्रत्येक वेळीस वेगवेगळी उत्तरे मिळायची. काही वेळेला तर अक्षरशा फक्त पाण्यावर दोन दोन दिवस काढले, राहुरी ते मुंबई पर्यंतचे फक्त भाडयाचे पैसे असायचे त्यात एक पायही अधू तरीही जबरदस्त आत्मविश्वास होता, ” शाहीर कलेवर त्यांच प्रेम होतं, सन १९८७ मध्ये त्यांनी शिवगर्जना कलामंच स्थापन केला, सन १९९६ साली त्या संस्थेला धर्मदाय आयुक्ताचे प्रमाणपत्र मिळाले त्या संस्थेचे उद्देश नवोदित कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करुन देणे, अपंगाना सहाय करणे असे आहेत, गेल्या दोन महिन्यापूर्वी शिवगर्जना तर्फे लोक कलाकारांचा मेळावा घेऊन त्यातील निवडक कलावंताच्या कॅसेट लवकरच काढण्यास येणार आहेत.

विजय तनपुरेंनी तयार केलेल्या कॅसेट मध्ये पंढरीचा विठोबा, मंगलदायीनी सप्तशृंगी, मोहट्याची जगदंबा, शिर्डीचे साईबाबा, संत महिपती, महाराज शनैश्वर, महिमा अक्कलकोट स्वामी, हिंदू हृदयसम्राट भाग १ व २, धर्मवीर आनंद दिघे, पद्मश्री विठठलराव विखे, पा जनरल अरुणकुमार वैद्य अशा अनेक कॅसेट सध्या महाराष्ट्रभर गाजताहेत.

एका मागून एक अशा ७१ कॅसेट विजय यांनी गाऊन यशस्वी करून दाखविल्या. दहा वर्षाच्या प्रदिर्घ तपश्चर्ये नंतर विजय तनपुरे या सर्व सामान्य मुलाचा शिवशाहीर विजय तनपुरे बनला.

अपंग असूनही जिद्दीमुळे त्यानी पोवाड्याच्या क्षेत्रात जे यश संपादन केलं, त्याची दखल केंद्र शासनानेही घेतली आहे, आंतरराष्ट्रीय सांस्कृतीक देवाणघेवाण योजनेअंतर्गत भारतातून मॉरिशस मध्ये कलाकाराचे एक पथक जाणार आहे त्यासाठी विजय तनपुरे ची निवड झाली आहे. महाराष्ट्राच्या दृष्टीने ही बाब अतिशय अभिमानास्पद आहे, महाराष्ट्रातील लोकसंगीत शाहीर कला आता हळूहळू नष्ट होत चालली आहे, विज्ञानाच्या क्रांतीने संगीत क्षेत्रातही पदार्पण केल आणि सार्‍या संकल्पना अभिरुची बदलत गेली, हातात डफ बाजूला ढोलकी, तुणतुण  डोक्याला बांधलेला भगवा फेटा आणि शाहीराचा खडा आवाज हे चित्र अगदी अलीकडच्या काळापर्यंत शिवजयंती व गणेश उतसवाच्या कार्यक्रमातून दिसत होते, आता हार्मोनियमची तुणतुण्याची जागा सिंथेसायझरने घेतली आहे, केवळ हाताच्या बोटावर मोजण्याइतके शाहीर आता महाराष्ट्रात उरले आहेत. खर तरं शाहीर म्हणजे एके काळी महाराष्ट्राचा प्राण होता, छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या वीर पुरषाचा पराक्रम गाथा ऐकावी ती खरी तर शाहीरांच्या मुखातूनच देश भक्तीची ज्योत प्रज्वलीत ठेवण्याच काम शाहीर गोविंद पांडुरंग खाडीलकर, आत्माराम पाटील, अमर शेख, यांनी पोवाडे गाऊन सर्वसामान्य जनतेमध्ये लोकजागृती केली, सध्याच्या तरुण रसिक वर्गाला पोवाडा किती आवडतो, हे सांगता येणार नाही, पण अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथे रहाणार्‍या विजय तनपुरे या तरुणाला पोवाड्याने अक्षरशः वेड लावले आहे.

प्रचंड ध्यास व कोणतेही कष्ट करण्याची तयारी असेल तर एखादा अपंग तरुण कलाकार काय करु शकतो, याचे उदाहरण म्हणजे विजय तनपुरे. महाराष्ट्रातून शाहीर कला नष्ट होत चालली असली तरी राहुरी सारख्या गावातील तरुण शिवशाहीर विजय तनपुरे ते जोपासण्याचा प्रयत्न करतात. हे अतिशय महत्त्वाच आहे, लोकशाहीतील एक तरुण शिवशाहीरास मानाचा मुजरा . . . .

गेल्या २० वर्षापासून विजय तनपुरे शाहीरीचे कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रात करत आहेत. बालपणामध्येच राहुरी परिसरात श्री सुदर्शन महाराज पंढरपुरकर यांचे किर्तनाचे कार्यक्रम होत असायचे. त्यांच्यापासून व कै. शिवशाहीर बाबासाहेब देशमुख यांच्या कॅसेटच्या प्रभावामुळे विजय पोवाडे गाऊ लागले.
हरिकिर्तन आवडायचे पण ते शाहीरीतच रमायचे. श्री विजय सेठी यांच्या सहकार्यामुळे कॅसेटच्या जगतात यशस्वी पदार्पण झाले आणि त्या पाठोपाठ वेगवेगळ्या विषयावरील स्वयंरचित पोवाड्यांच्या कॅसेट मुंबईतील व्हीनस, टिप्स, टि सिरीज, प्रिझम आदी नामांकित कंपन्याद्वारे संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाल्या. आकाशवाणी आणि दूरदर्शनसाठी पोवाडे होत गेले. पण तरीही मनाला पाहिजे तसे समाधान मिळत नव्हते.
जानेवारी २००५ साली नेहमीप्रमाणे मुंबईत गेले. दुरदर्शन केंद्रावरील अधिकारी श्री शशिकांत भोसले यांच्याशी चर्चा करताना ते सहजच म्हणाले, शाहीर दूरदर्शनवर आमचा || नाचु किर्तनाचे रंगी || हा कार्यक्रम सुरू आहे. आपण उत्कृष्ट शाहीर आहात. श्री तुकाराम महाराजांचा एखादा अभंग घेवून आपणही कीर्तनाचा एक कार्यक्रम दूरदर्शनवर करायला काय हरकत आहे. पण मन तयार होईना. ते त्यांना म्हणालेही की ”साहेब कीर्तन मी सहजच करील पण दूरदर्शनवरील कीर्तन पाहून जर मला इतरांनी आपल्याकडे कीर्तनाला येण्याचे निमंत्रण दिले तर त्यावेळी मी काय करू. त्यापेक्षा मी किर्तनाचे रितसर प्रशिक्षण घेतो, अभ्यास करतो आणि मग आपण कार्यक्रम करू. ” आणि त्यादृष्टीने हालचाली सुरु केल्या. आळंदीला श्री. ह. भ. प. निमराज महाराज महाराज जाधव यांचेकडे विचारणा केली. पण कुटूंब वार्‍यावर सोडून कसे जायचे हा प्रश्न समोर होता. कारण संसारी माणसाने संसाराच्या वाटेवरच मोक्ष मिळवायचा असतो हे लहानपणी कीर्तनात ऐकले होते. अशातच अनेक महिने निघुन गेले आणि ऑक्टोबर २००५ साली प्रसिद्ध किर्तनकार ह. भ. प. श्री बाबा महाराज सातारकर पाच दिवस कीर्तनसाठी राहुरीला आले आणि पाचही दिवस त्यांची कीर्तने ऐकली. अगदी नोकरीवर खोटं बोलून ते कीर्तनाला गेले आणि त्यांचा प्रभाव विजय यांच्यावर पडला आणि त्यांनी मनाशी निश्चय केला की काही झाले तरी कीर्तन शिकायचेच.

|| निश्चयाचे बळ तुका म्हणे हेचि फळ || या संत वचनाप्रमाणे कामाला लागले. सांस्कृतिक कार्य संचानालयातर्फे कीर्तन प्रशिक्षणाच्या सत्रासाठी अर्ज पाठवून दिला आणि त्यांना कीर्तनाच्या शिक्षणाला श्री प्रकाश महाराज बोधले डिकसळ जि. उस्मानाबाद येथे प्रवेश मिळाला. त्यावेळी त्यांचे सोबत चिंचविहिरे ता. राहुरी येथील त्यांचे स्नेही श्री अशोक सावंत हे होते आणि १२ सप्टें. २००६ रोजी ते दोघे कीर्तनाच्या प्रशिक्षणास डिकसळ येथे पोहचले. तेथे गेल्यावर ते शाहीर आहेत असे सांगितले नाही. अगदी सर्वसामान्य विद्यार्थ्याप्रमाणे तेथे राहिले. पहाटे पाच वाजता उठायचे थंड पाण्याने आंघोळ करायची. योगासने होऊन सकाळी ९ ते ६ या वेळेत कीर्तनाचे पाठ सुरू करायचे. रात्री १२/१ वाजेपर्यंत सराव चालायचा. त्यावेळी श्री अशोक सावंत यांनी विजय यांची फार सेवा केली. अपंग असल्यामुळे त्यांचे सर्व कामे हे अशोक सावंत निरपेक्ष वृत्तीने करायचे. १४ ऑक्टोबर २००६ रोजी त्यांचे प्रशिक्षण संपले. समारोपाच्या दिवशी महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे सहायक संचालक श्री विद्याधर देशमुख व  ह. भ. प.प्रकाश महाराज बोधले यांनी ३० विद्यार्थ्यांमधून त्यांना सांगितले की, प्रशिक्षणात तुम्ही काय शिकलात याचे प्रात्यक्षिक २० मिनिटामध्ये करुन दाखवायचे. छातीमध्ये धडधड सुरू होतीआणी तेथे || नामसंकीर्तन साधन पै सोपे जळतील पावे जन्मांतरीची | या अभंगावर ४५ मिनिट कीर्तन केले आणि तेथे त्यांना महाराष्ट्र शासनाचे प्रमाणपत्र मिळाले. राहुरीला आल्यावर सर्वांना आनंद झाला. दिवाळीच्या फराळाच्या निमित्ताने अनेकजण येऊन भेटून गेले. त्यामध्ये प्रामुख्याने पत्रकार श्री भाऊसाहेब येवले, काळे मामा, श्री वसंतराव झावरे, श्री प्रसाद तनपुरे, श्री रावसाहेब साबळे, श्री किशोरभाऊ वने, श्री शरद निमसे आदींनी माझे अभिनंदन केले.
पण खरं धाडस केले ते मुळा प्रवरा संस्थेचे कर्मचारी श्री रावसाहेब कोळसे यांनी. आपल्या वडिलांच्या वर्षश्राद्ध निमित्ताने १९ जून २००७ रोजी त्रिंबकपूर ता. राहुरी येथे मला कीर्तनाची सेवा करण्याची संधी दिली. उच्च दर्जाची ध्वनी व्यवस्था त्या कार्यक्रमासाठी त्यांनी वापरली. सर्वांनाच त्यांचे किर्तन खूप आवडले. त्यानंतर देवळालीप्रवरा, गेवराई, उस्मानाबाद, पिंप्रीअवघड, चिंचविहीरे आदी ठिकाणी त्यांना कीर्तनाचे कार्यक्रम मिळत गेले. तनपुरे सांगतात ”माझे पूर्व जन्माचे काहीतरी पुण्य असेल त्यामुळेच माझ्या मुखातून देवाचे गुणगाण येत आहे.
|| पूर्व जन्माची असेल पुण्य सामुग्री तेव्हाच जिव्हाग्रे नाम येईल श्रीरामाचे ||
आता मी आध्यात्म्यात रंगून गेलो आहे यामुळे माझ्या बुद्धीला चालना मिळाली , विचार बदलले. आध्यात्मामध्ये काय आनंद असतो तो मी अनुभवीत आहे.
ब्रम्हभुत काया होतसे कीर्तनी
भाग्य तरी ऋणी देव ऐसा ||
प्रशिक्षण काळात नोकरीवर गैरहजर होतो. परंतु त्या दरम्यानचा माझा संपूर्ण पगार आ. श्री. राधाकृष्ण विखे पाटील व मुळाप्रवराचे चेअरमन श्री आण्णासाहेब म्हस्के कार्यकारी संचालक श्री पंडीत साहेब यांनी देवून माझा गौरवच केला. मुळा प्रवराचे राहुरी उपविभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे मला कीर्तनाला बाहेरगावी जाण्यासाठी नेहमीच सहकार्य मिळते. कीर्तन प्रशिक्षण काळात आम्हाला श्री महादेव महाराज अडसुळ, श्री शिंदे गुरुजी, श्री काकासाहेब बोधले, श्री पालकर महाराज, श्री नवनाथ अंबीकर महाराज, श्री मगर महाराज यांनी कीर्तनाचे पाठ शिकविले. यापुढेही मी शाहीरी कार्यक्रमाबरोबरच कीर्तनाला अग्रक्रम देवून आयुष्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत हरिनामाचा गजर करीतच प्रबोधनाद्वारे या समाजाची सेवा करतच राहणार आहे.
अपंगांना माझे सांगणे आहे की लाचारेने जीवन जगू नका. प्रयत्न करत रहा. यश तुमचेच आहे. आपले काय गेले यापेक्षा काय शिल्लक आहे याचा विचार करा. रडत बसू नका, हिंमतीने आलेल्या संकटांना तोंड द्या. परमेश्वर तुमच्या पाठीशी राहिल.”

3,471 total views, 1 views today